उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात शंभर टक्के क्षेत्रावर पेरा केला. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने काढणीस आलेली पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावरच होती. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट घालून दिले होते. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँकांकडून २७ हजार शेतकऱ्यांना २५९ कोटी ११ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ४० टक्के इतकी आहे.
चौकट..
आयडीबीआय बँक आघाडीवर
रब्बी हंगामात कर्जवाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. या बँकेस १७३ कोटी दहा लाखांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १३ हजार १४२ शेतकऱ्यांना १३९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ८१ टक्के आहे. त्याखालोखाल आयडीबीआय बँक आघाडीवर असून, या बँकेस १७ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ६७९ शेतकऱ्यांना १२ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले असून, कर्जवाटपाची टक्केवारी ७० इतकी आहे.
खरिपापेक्षा रब्बीत संथगती
खरीप हंगामात जिल्ह्यातील सरकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच खासगी बँकांना १५९० कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. खरिपात एक लाख २५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ९१४ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. याची टक्केवारी ५७ इतकी आहे, तर रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र फेब्रुवारीअखेरपर्यंत बँकांनी २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. याची टक्केवारी ४० एवढी आहे. खरिपापेक्षा रब्बी हंगामात कर्जवाटप संथगतीनेच होत असल्याचे आकडेवारी दिसून येते.