धाराशिव : वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सोमवारी धाराशिव जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी भारत मातेचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.
माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये मोठी विसंगती निर्माण झाली आहे. ही विसंगती दूर करावी, या मागणीसाठी माजी सैनिकांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चास श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलातून प्रारंभ झाला.
हा मार्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. मोर्चात हाती राष्ट्रध्वज घेऊन माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, वॅन रँक वन पेन्शन लागू झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेश गुंड, सचिव डी. बी. पवार, सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे, शहाजी गोरे, कार्याध्यक्ष बबन कोळी आदी माजी सैनिक सहभागी झाले होते