उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित हे दोन नेते वगळता सर्वच अन्यायग्रस्त आहेत, अशी टिप्पणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बांधणीसाठी माजी खासदार शेट्टी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असतानाच माजी खासदार शेट्टी यांनीही मोठे विधान केले. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अवकाळी पावसामुळे आमचा शेतकरी किड्या-मुंग्या प्रमाणे मरत आहे. त्यामुळे आमच्या या प्रश्नांपुढे राज्यातील अन्य प्रश्न गौण आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाना साधला.
महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये शेतकरी कर्जमुक्त करणे व थकित वीजबिल माफ करणे या दोन बाबींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सरकारने सदरील दोन्ही निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सोबतच १ रूपया १६ पैसे प्रति युनिट या प्रमाणे कृषी पंपास वीजपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोल हिप्परगे यांची प्रमुख उपस्थिती होती.