कळंब : मागच्या आठवडाभरापासून सुरू असलेलं कळंब आगारातील कर्मचार्यांचे आंदोलन वेगळ्याच ट्रॅकवर गेले असून सोमवारी पहाटेपासून एक कर्मचारी आत्महत्या करण्यासाठी गळफास सज्ज ठेवून चाळीस फुट उंच झाडावर जावून बसला आहे. झाडावर आक्रमक आंदोलक अन् खाली टाहो फोडणारे नातेवाईक अशी खळबळजनक व ह्रदयद्रावक स्थिती याठिकाणी दिसून येत आहे.
महागाई भत्ता, वेतनवाढ, राज्य शासनात विलगीकरण अशा विविध मुद्यावर एसटी कर्मचारी यांचे आंदोलन सुरू होते. यात पहिल्या टप्यात कर्मचारी संघटना पदाधिकारी सामील झाल्यानंतर त्यांना सर्व कर्मचार्यानी पाठिंबा दिल्यानंतर एसटीची वाहतूक ठप्प झाली होती.यानंतर मागच्या चार दिवसापूर्वी हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी पुढं तीन दिवस संघटना विरहित थेट कर्मचारी यांनी विलगीकरणाच्या मुद्यावर आंदोलन सुरूच ठेवले होते.शनिवारी आ. कैलास पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर कळंब आगाराची वाहतूक रूळावर येत होती. अशी स्थिती असतानाच सोमवारी भल्या पहाटे येथील आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले ३६ वर्षीय सच्चिदानंद अशोक पुरी हे वाहकांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला.
सकाळच्या शेड्युलमधील ड्यूटी करण्यासाठी आलेल्या कर्मचार्याना वाहक पुरी हे आगाराच्या समोरील भागात असलेल्या उंच अशा एका झाडावर गळफास लावण्याच्या तयारीत दिसुन आले. यामुळे एकच खळबळ उडाली. इतर सर्व कर्मचारी याठिकाणी दाखल झाले.किमान पस्तीस फुट उंचावर झाडांच्या फांदीला बांधलेला दोरखंड, त्यास तयार केलेला गळफास व दोन फाट्याच्या मध्ये असलेले आंदोलक पुरी हे मन हेलावून टाकणारे चित्र सर्वांच्या काळजाचा ठोका वाढवत होते. किती ही आग्रह केला तरी ते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार,पोलिस निरिक्षक, आगारप्रमूख त्याठिकाणी ठाण मांडून होते. त्यांनी आवाहन केले तरी आंदोलन चालूच होते. पुरी हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते तर कर्मचारी संघटना वर तीव्र रोश व्यक्त करत होते.अखेर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणे झाल्यानंतर साडेआठ वाजता वाहक सच्चिदानंद पुरी झाडावरून खाली आले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आंदोलक झाडावर, खाली टाहो अन् संताप...
दरम्यान, साधारणपणे पस्तीस फुट उंचावर कळंब आकाराचे वाहक सच्चिदानंद अशोक पुरी या वाहकाचे आंदोलन सुरू होते. गळफास सज्ज होता. त्याठिकाणी कोणी पोहोचू शकत नव्हते. कोणत्या क्षणाला काही होईल याचा नेम नव्हता. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका वाढत होता. आंदोलक झाडावर तीव्र भावना व्यक्त करत होते तर खाली नातेवाईक आर्त टाहो फोडत होते. इतर सहकारी कर्मचारी संघटना, त्यांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शासन यांच्या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करत होते.