फोटो (३०-१२) अरुण देशमुख
भूम : शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरात आलमप्रभू देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बुधवारीही एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुकांची गर्दी अन् दुसरीकडे वाहनांची पार्किंग यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांंनादेखील रस्ता शोधताना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.
बुधवारी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरात सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती. येथील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही आलमप्रभू देवस्थान जवळ असलेल्या हॉलमध्ये करण्यात आली असल्यामुळे आलमप्रभू रोडवरुन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्यांची मोठी वर्दळ होती. नेमक्या याच रोडवर पंचायत समितीजवळ अनेकांनी चारचाकी, दुचाकी वाहने लावल्याचे दिसून आले. यामुळे दिवसभरात अनेकवेळा वाहतुकीचा बोजवारा उडाला. विशेष म्हणजे याच रोडवर रवींद्र हायस्कूल व गुरुदेव दत्त हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांचीही या रस्त्यावर वर्दळ असते. तसेच प्रशासकीय इमारतीकडे जाणारे नागरिक, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असते. यातच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने दिवसभर वाहतूक जाम झाल्याचे दिसून आले. या परिसरात इतरवेळीसुद्धा अस्ताव्यस्त पार्किंग असते. ओंकार चौकात हीच परिस्थिती असून, अनेकजण भर रस्त्यात थांबून गप्पा मारत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे या भागात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून वाहतुकीस शिस्त लावावी. अस्ताव्यस्त पार्कींग करणारांवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी शहरवासियांमधून केली जात आहे.