उमरगा : तालुक्यातील तुरोरी ते दगडधानोरा या राज्य सरहद्द आंतरराज्यमार्ग ४९ या रस्त्यावर खड्ड्याचे व काटेरी झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे वाहनधारक व प्रवशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
तालुक्यातील तुरोरी ते दगडधानोरा हा राज्यरस्ता कर्नाटक राज्याला जोडला गेला असल्याने दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य हद्दीतील गावासोबतच कर्नाटकातील अनेक गावांतील नागरिक बाजार, दवाखानानिमित्ताने उमरगा व तुरोरी या गावी याच रस्त्याने येत असतात. परंतु, या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारक, प्रवासी त्रस्त आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण २०१५-१६ मध्ये करण्यात आले होते; परंतु, यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी व दुरुस्तीसाठी एकही रुपया खर्च झाला नाही. यामुळे सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून राहत असून, वाहनधारकांना या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन प्रवासी व वाहनधारक जखमी होत आहेत. त्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
चौकट......
खड्ड्यांमुळे बससेवा बंद
उमरगा आगारातून रोज सकळी ७.३० ते सायंकाळी ७.३० या दरम्यान गेली अनेक वर्षांपासून रोज मुक्कामी जाणारी उमरगा ते लाडवंती ही बसदेखील महामंडळाने खड्ड्यांमुळे बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील दाबका, तुरोरी, आष्टा जहागीर, मळगी मोड, गुरुवाडी मोड, मळगीवाडी, दगडधानोरा व कर्नाटकातील गदलेगाव, रामतीर्थ, आदी गावांतील ग्रामस्थांना खासगी प्रवासी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.