उस्मानाबाद : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय पुरस्कृत ज्ञानदा सुशिक्षित बेरोजगार सामाजिक संस्था, मोटार मालक संघ आणि रोटरी क्लब यांच्यावतीने चालकांची मोफत नेत्रतपासणी करून गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र रूपदास, प्रशांत भांगे, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ आचार्य, मोटार मालक संघाचे जिल्हाध्यक्ष मैनोद्दीन पठाण, सचिन सोमवसे, रोटरी क्लबचे डॉ. इसाके, सगुनाताई आचार्य आदी उपस्थित होते.
कृषी विभागाची शेतशिवार फेरी
लोहारा : तालुक्यातील वडगाव (गां) येथे कृषी कार्यालयाच्यावतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन करून आराखडा तयार करण्यासाठी शेतशिवार फेरी काढण्यात आली. यावेळी जलसंधारण, मृदसंधारण, वृक्ष लागवड, बचतगट, महिला बचतगट, फळ लागवड, सिंचनाच्या सुविधा आदींची माहिती संकलित करण्यात आली. यावेळी सरपंच बबन फुलसुंदर, उपसरपंच लक्ष्मण भुजबळ, चेअरमन बिभीषण पवार, विलास फुलसुंदर, कृषी मंडल अधिकारी जी. डी. माळी आदी उपस्थित होते.
काळे महाविद्यालयात वित्तीय साक्षरता शिबिर
ढोकी : येथील वसंतराव काळे महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने एकदिवसीय वित्तीय साक्षरता शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक जरीपटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, पवन पाटील, हणमंत अंकुश, पंकज जीवने, डॉ. बालासाहेब मैनद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मैंद यांनी केले तर डॉ. राजकुमार जाधव यांनी आभार मानले.
वागदरीतील ग्रामस्थांचा अभियानाला प्रतिसाद
तुळजापूर : तालुक्यातील वागदरी येथे ‘माझा गाव सुंदर गाव’ अभियानाला सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रामसेवक जी. आर. जमादार, रिपाइंचे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विद्या बिराजदार, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, दत्ता सुरवसे, महादेव बिराजदार, रोजगार सेवक रामसिंग परिहार आदी उपस्थित होते.
हरिनाम सप्ताहाला करजखेड्यात प्रारंभ
लोहारा : करजखेडा येथे शुक्रवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला. ज्ञानेश्वर पारायण व्यासपीठ ह. भ. प. रामेश्वर ऊर्फ हरी चव्हाण महाराज सांभाळत आहेत. या सप्ताहानिमित्त मंगळवारी चैतन्य वासकर महाराज, बुधवारी तुकाराम हजारे महाराज यांची कीर्तनसेवा होणार आहे. गुरूवारी महेश महाराज कानेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
लतिका पेठे यांची सरचिटणीसपदी निवड
तेर : येथील लतिका पेठे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, जिल्हाध्यक्ष माधुरी गरड यांच्या हस्ते पेठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पेठे यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे.
विभागीय अध्यक्षपदी वीर यांची नियुक्ती
(सिंगल कॉलम पट्ट्यात फोटो : निवृत्ती वीर १५)
उस्मानाबाद : डब्ल्यूएसएफएस ह्युमन राईट आणि ॲण्टी करप्शन कौन्सिलच्या मराठवाडा विभागाध्यक्षपदी निवृत्ती वसंतराव वीर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. वाजीद सलीम शेख यांच्या हस्ते वीर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव ॲड. मिलिंद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष वाहेद शेख, ॲड. खमर शेख, फेराज खान, प्रशांत शेटे, उमेश धनलोभे आदी उपस्थित होते.
बससेवा सुरू
तेर : कळंब आगाराने येथील बसस्थानकातून तेर - माजलगाव ही बससेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने वाहक अलीम बागवान, चालक एस. बी. बारकूल यांचा सत्कार करण्यात आला.
कसबे यांची निवड
कळंब : तालुक्यातील मोहा येथील राहुल जयदेव कसबे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.