तुळजापूर (उस्मानाबाद) : प्रसूतीची तारीख जवळ आलेली असतानाही कुटूंबाचा गाडा ओढण्यासाठी उसाच्या फडात राबणाऱ्या एका महिलेने एसटीतच कन्यारत्नास जन्म दिल्याची घटना आज सकाळी घडली. चालक-वाहकांनी प्रसंगावधानता दाखवून माता व बाळास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने दोघेही सुखरुप आहेत़
सोनपेठ तालुक्यातील सोनखेडा तांडा येथील सगुना अंकुश राठोड (वय २३) या तुळजापूर तालुक्यातील आरळी बु़ येथे कुटूंबासह उसतोडीसाठी आल्या होत्या़ प्रसूतीची तारीख जवळ आलेली होती़ सातत्याने प्रसवकळाही सुरु होत्या़ तरीही त्या कुटूंबाचा गाडा ओढण्यासाठी उसाच्या फडात राबत होत्या़ यातच आज सकाळी पुन्हा प्रसवकळा सुरु झाल्या़ त्यामुळे सासू-सासऱ्यांनी सगुणास तुळजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरळी येथून निलेगाव-तुळजापूर बस पकडली.
ही बस तुळजापूरकडे रवाना होताना काही अंतरावरील देवसिंगा गावाजवळ आली असता सगुणा राठोड यांची बसमध्येच प्रसूती झाली़ त्यांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला़ ही बाब कळताच चालक संपूर्णसिंह राजपूत व वाहक प्रदीप वडवले यांनी तातडीने बस थेट तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातच पोहोचविली़ माता व बाळास रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनीही पुढील उपचार तात्काळ सुरु केले़ त्यामुळे माता व बाळ सुखरुप आहेत़
यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ़ होनमाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माता व तिचे बाळ सुस्थितीत आहेत़ मात्र, बाळाचे वजन हे सर्वसामान्य बाळापेक्षा कमी आहे. यादृष्टीने तिच्यावर उपचार सुरु केले आहेत़ असे असले तरी तिची प्रकृती चांगली असल्याचेही डॉ़होनमाने म्हणाले़
संकोचामुळे बस तशीच चाललीसगुणा राठोड या महिलेची चालत्या बसमध्येच प्रसूती झाली होती़ ही बाब तिच्या सासू-सासऱ्यांच्या लक्षात आली़ मात्र, चालक-वाहक आपले ऐकतील का? असा संकोच बाळगून ते काही वेळ गप्पच राहिले़ जेव्हा ही बाब इतरांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी चालक-वाहकास कळवून बस रुग्णालयात नेण्याची सूचना केली़ रुग्णालयात पोहोचल्यानंतर महिलेच्या सासऱ्याने हात जोडून चालक-वाहक व प्रवाश्यांचे आभार मानले़.