- बाबुराव चव्हाण उस्मानाबाद - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नुकतीच कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. याच यादीतील उमेदवारांना थेट अतिरिक्त डीएचओ' यांच्या स्कॅन स्वाक्षरीने अज्ञात भामट्यानी मोबाईलवर नियुक्तीपत्र धाडून पैशांची मागणी केली. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून स्टाफ नर्ससह अन्य पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यातील पात्र उमेदवारांच्या कागदपात्रांची छाननी केल्यानंतर यादी प्रसिध्द करण्यात आली होती. हीच संधी साधत अज्ञात भामट्यांनी यादीतील उमेदवारांना फोन करून ''मी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बोलत आहे. तुम्ही सदरील भरतीतून अपात्र झाले आहेत. मी तुम्हाला पात्र करतो. त्यासाठी तुम्हाला नियुक्ती आदेश मिळण्यापूर्वी काही व आदेश मिळाल्यानंतर उर्वरित पैसे द्यावे लागतील'', असे भामट्यांकडून सांगितले जात होते. त्यानुसार काहींना मोबाईलवर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्कॅन स्वाक्षरीने फेक नियुक्तीपत्र धाडली. 'ज्यावर जिल्हा आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन' असा उल्लेख होता. संशय आल्यानंतर काही उमेदवारांनी थेट आरोग्य विभागाशी संपर्क केला. त्यानंतर हा भांडाफोड झाला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी का सर्व प्रकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना सांगितला. गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.त्यानुसार रात्री उशिरा डीपीएम गरड यांनी आनंद नगर पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध कलम ४६५, ४६८ आणि ४६९ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.