धाराशिव : शासनाने नोकर भरतीचे अधिकार खाजगी कंपनी व एजन्सीला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी फकिरा ब्रिगेड संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.
शासनाने नोकर भरतीसाठी अधिकार खाजगी कंपनी व एजन्सींना दिले आहेत. त्यामुळे तरुणांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मागासवर्गीय संघटनांच्या वतीने त्याचा कडाडून विरोध दर्शविला जात आहे. सोमवारी फकिरा ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, शासनाने खाजगीकरणाबाबत घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील शासनाने संपादित केलेल्या जागेवर भोगवाटदार म्हणून राहत असलेल्या लोकांचा ऑनलाईन सर्व्हे करुन त्यांचा नियमाकुल मालकी हक्क प्रमाणपत्र देण्यात यावे, पात्र लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीरंग सरवदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नागिणी थोरात, अर्जुन सरवदे, अनिता खंदारे, किसन गवळी, सचिन शिंदे, राधिका गवळी, सत्यवान वाघमारे आदी सहभागी झाले होते.