उस्मानाबाद : पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन चिटर’ असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला.
काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानिमित्त सोमवारी तुळजापूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, तुकाराम रेंगे, पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील सुमारे साडेतेरा हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी २ हजार शेतकर्यांनी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मृत्युला कवटाळले. याला कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारकडे सरसकट कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. मग जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धीवर खर्च करण्यासाठी कोट्यवधी रूपये आले कुठून, असा सवाल करीत शेतकर्यांप्रती सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. फडणवीस सरकार जनतेच्या पैशाची अक्षरश: उधळपट्टी करीत आहेत. काल-परवाच २२५ ‘व्हीआयपी’ वाहने खरेदीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक वाहन तर ‘बुलेटप्रुफ’ असून ज्याची किंमत ५६ लाख रूपये असल्याचे सांगत हा निर्णय देखील जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचाच भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप झाले. काही प्रकरणांत समिती गठित करून चौकशीचा फार्स केला. परंतु, प्रत्येकवेळी संबंधित मंत्र्यांना ‘क्लिनचिट’ देण्याचे काम झाले. यवतमाळमध्ये पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना चाळीस शेतकर्यांचा जीव गेला. चोहोबाजुंनी टिकेची झोड उठल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली, आणि या समितीने सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. त्यामुळे फडणवीस सरकार हे जनतेला फसविणारे ‘क्लीन चिटर’ असाल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी त्यांनी आरक्षण, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी मुद्यावरूनही भाजप सरकारला त्यांनी ‘लक्ष्य’ केले.
३१३ कोटीच्या मदतीने काय होणार?मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागात झालेल्या गारपीटीमुळे रबी पिकांसोबतच फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. विशेषत: द्राक्ष उत्पादक शेतकरी मोडून पडला आहे. अशावेळी गारपीटग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत देवून आधार देण्याची गरज होती. परंतु, फडणवीस सरकारने ३१३ कोटी रूपये एवढी तुटपुंजी मदत जाहीर करून गारपीटग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोपही खा. चव्हाण यांनी केला.
आघाडीचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेतीलआगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा प्रश्न खा. चव्हाण यांना केला असता, आघाडी करावी की करू नये, या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. त्याचा अहवाल तयार करून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला जाईल, आणि अंतिम निर्णयही तेच घेतील, अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली.