येरमाळा : शेतकऱ्यांनी एकत्र येत लाेकसहभागातून सापनाई शेतरस्त्याचे काम केले. हे मातीकाम पूर्ण हाेऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लाेटला आहे; परंतु अद्याप प्रशासनाकडून मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा लवकर पाऊस झाल्यास हा रस्ता वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील इनामी शिवार ते मेघळातील शिवार असा एकूण दीड किलाेमीटर शेतरस्ता ११० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लाेकसहभागातून तयार केला. साधारपणे महिनाभरापूर्वी मातीकाम पूर्ण करण्यात आले. यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घेतले जावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा सुरू केला. परंतु, अद्याप त्यास मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे सध्या संबंधित शेतकरी चिंतेत आहेत. कारणही तसेच आहे. ज्या भागातील रस्त्याचे मातीकाम करण्यात आले आहे, ताे रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे दलदलमय हाेताे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना येथून ये-जा करणे कठीण हाेते. काढणी केलेली पीक शेतातच पडून राहतात. परिणामी शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेते. उपराेक्त प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम करणे गरजेचे आहे.
चाैकट...
काय म्हणतेय ग्रामपंचायत?
शेतरस्त्याचे काम राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सध्या लाॅकडाऊन असल्याने प्रक्रियेस विलंब लागत आहे. दरम्यान, नुकतीच कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून मजुरांच्या मस्टरला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
काेट...
शेतरस्त्याचे मातीकाम पूर्ण हाेऊन महिनाभराचा कालावधी लाेटला आहे. परंतु, ग्रामपंचायतीकडून मजबुतीकरणासाठी अद्याप कुठल्याही स्वरूपाच्या हालचाली हाेताना दिसत नाहीत. पावसाळ्यापूर्वी हे काम न झाल्यास रस्ता पुन्हा जैसे थे हाेईल.
-सतीश बावळे, शेतकरी, सापनाई.
रस्त्याच्या प्रशासकीय मंजुरीसाठी मस्टर वरिष्ठ कार्यालयाला सादर केले आहे. परंतु, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन लागू आहे. त्यामुळे दाखल केलेल्या मस्टरला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यातून काय मार्ग काढता येईल, या अनुषंगाने चर्चा सुरू आहे.
-अशाेक आमले, ग्रामविकास अधिकारी, सापनाई.