उस्मानाबाद : एटीएम कार्डची आदलाबदल करून आरळी (बु.) येथील एकाची सुमारे १९ जार ४०० रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अनोळखी दोघांविरूद्ध शुक्रवारी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) येथील कालिदास गोविंद डोंगरे हे तुळजापूर शहरातील कॅनरा बँकेच्या ‘एटीएम’मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. डोंगरे पैसे काढण्याच्या प्रयत्नात असतानाच अनोळखी दोघेजण ‘एटीएम’मध्ये आले. ‘पैसे काढून देतो’, असे सांगत डोंगरे यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन त्यांना स्वत:कडील दुसरे एटीएम कार्ड दिले. हा सर्व प्रकार लक्षात येण्याच्या आतच अनोळखी दोघेही तेथून निघून गेले. आणि काही क्षणातच डोंगरे यांच्या खात्यातून १९ हजार ४०० रूपये काढून घेतले. पैसे ‘विड्रॉल’ झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे डोंगरे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी डोंगरे यांनी शुक्रवारी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अनोळखी दोघांविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.