भाऊ पांडा पाटील असे दगावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पिंपळा (बु.) शिवारात तामलवाडी साठवण तलावाच्या काठावर अडीच एकर जमीन आहे. महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक वाया जाऊ लागले हाेते. त्यामुळे शनिवारी सकाळी ७ वाजता सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या भाऊ पांडा पाटील यास विषारी सापाने दंश केला असता ते बेशुद्ध पडले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी वाहनातून उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. भाऊ पाटील यांच्या पार्थिवावर पिंपळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात दाेन मुले, दाेन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास व्ही. एस. भाेसले हे करीत आहेत.
चाैकट...
आजवर तिघांचा सर्प दंशाने मृत्यू
सोयाबीन पिकात खुरपणी, पाणी देणे आदी मशागतीची कामे करताना काटी येथील नागनाथ सोनवणे, पिंपळा (बु.) येथील भाऊ पांडा पाटील, तर काटी येथील सोनाबाई विठ्ठल क्षीरसागर या तिघांचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला आहे. तसेच सांगवी (काटी) येथे राधा रवि मगर, तर काटी येथील शामल किसन हंगरकर या दोन महिलांना सर्प दंशामुळे जखमी झाल्या. यंदा सापांचा वावर सोयाबीनसह उडीद, मूग आदी पिकांत अधिक आहे. परिणामी सर्प दंशाच्या घटना वाढल्या आहेत.