तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा (तुळ), आदी १४ गावांतील खरिपातील ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी अर्धा पावसाळा संपत आला असतानाही या परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडेच असून, या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
यावर्षी तुळजापूर मंडळात सर्वाधिक ९ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला. याशिवाय, ३३८ हेक्टरवर उडीद, २४० हेक्टर मूग, २१२ हेक्टर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. या भागात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वर्षी रोहिणी नक्षत्रातील पावसाने शेवटच्या टप्प्यात मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य नक्षत्रात अधूनमधून झालेल्या पावसामुळे कशीबशी पिके तग धरून राहिली. मात्र, गेल्या पंधरवड्यात पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती. हलक्या रानावरील पिके तर चक्क जळून गेल्याने शेतकऱ्यांनी ती उपटून जनावरांना टाकली. मागच्या दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले खरे; मात्र उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. दरम्यान, सरसकट पिकांचे पंचनामे करून पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
सध्या सोशल मीडियावर २५ टक्के विमा कंपनी भरपाई मिळणार, अशी पोस्ट फिरते आहे. मात्र, शंभर टक्के नुकसान झाले तर ४५ हजार रुपये हेक्टरी विमा भरपाई मिळते. त्यानुसार २५ टक्क्यांप्रमाणे ११ हजार २०० रुपये मिळणार असतील तर ही शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल.
- आबासाहेब कापसे, सिंदफळ.
गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात पन्नास टक्के घट होणार आहे. मध्यंतरी पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या झाडांना शेंग कमी लागल्यात. त्यातही बहुतांश शेंगांमध्ये बी भरलेले नसल्याने उतार कमी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
- रणजित नंन्नवरे, हंगरगा (तुळ).
मी दोन बॅग उडीद पेरला होता. मात्र, त्याच्या फूल धारणेच्या व फळधारणेच्या काळात पाऊस झाला नसल्याने उडीद करपून गेला. त्यामुळे काढून बांधावर फेकून दिला. त्यामुळे विमा कंपनीने शंभर टक्के भरपाई देणे गरजेचे आहे.
- बळी सुरवसे, मोर्डा
280821\img-20210814-wa0112.jpg
काक्रंबा परिसरातील जळून जात असलेली सोयाबीनची पिके