उस्मानाबाद : पीक विम्याच्या रकमेतून कपात केलेले पैसे परत करावेत, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कळंब तालुक्यातील नायगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आंदोलनातशेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा बँकेच्या नायगाव येथील शाखेत शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. विमा रकमेचे वाटप सुरू झाल्यानंतर २७ आॅगस्ट, १ आणि ९ आॅक्टोबर २०१८ रोजी बँकेने बहुतांश खातेदारांच्या रकमेतून १ हजार ते ३ हजार रूपयांपर्यंत पैसे कपात केले. ही रक्कम परत मिळावी, यासाठी मागील काही महिन्यांपासून संबंधित शेतकऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु, बँकेकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. कपात केलेले पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ आॅक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी कळंब तहसीलदारांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली होती.
तसेच कपात कलेले पैसे न मिळाल्यास २१ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. यानंतरही संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलनास पाठींबा दिला. यावेळी दिलीप मधुकर नाडे, व्यंकट दत्तू धाराशंकर, राजाभाऊ शितोळे, रामहरी गायकवाड, बालाजी कोकाटे, उत्तम गायकवाड, नानासाहेब शितोळे आदी शेतकरी उपस्थित होते.
तर तीव्र आंदोलन करूजिल्हा बँकेच्या नायगाव शाखेतून निराधारांच्या पगारातून शंभर रूपये कपात केले जातात. पासबूकही प्रिंट करून दिले जात नाही. पीक विमा रकमेतून कपात केलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. उपरोक्त प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैभव पाटील यांनी दिला आहे.