उस्मानाबाद : पीक विम्यापोटी जिल्हा बँकेकडे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १७७ कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. असे असतानाही १६ मेअखेर केवळ २४ कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. एकेका शेतकऱ्यांने खात्यावरील विमा उचलण्यासाठी सहा ते सात दिवसांपूर्वी स्लिप भरून दिली आहे. परंतु, आजपावेतो त्यांच्या हातावर रक्कम ठेवलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
जून महिन्यात पाऊस पडेल, असे हवामान खात्याने भाकित केले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हातही शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकताना दिसत आहे. अनेक शेतकरी खत, बी-बियाणे खरेदीसाठी आतापासूनच पैशाची जमवाजम करू लागले आहेत. असे असतानाच पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. तयामुळे शेतकऱ्यांना मोठा धीर मिळाला. येथील जिल्हा बँकेकडे विम्यापोटी सुमारे १७७ कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. ही रक्कम तातडीने वितरित करण्याबाबत आदेशा आहेत. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीतही याबाबतीत सूचना केल्या होत्या. असे असतानाही १६ मेपर्यंत अवघे २४ कोटी रूपये वितरित केले आहेत. जे पैसे वितरित करण्यात आले आहेत, त्यामध्ये दहा, वीस आणि पन्नास रूपयांच्या फाटक्या नोटा मोठ्या प्रमाणात असल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान, खात्यावरील पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी स्लिप भरून दिल्यानंतर सहा-सहा दिवस हातावर पैसे मिळत नाहीत. कळंब तालुक्यातील पाडोळी येथील शेतकरी परमेश्वर मेनकुदळे यांनी सहा दिवसांपूर्वी तूर विम्याचे नऊ हजार रूपये काढण्यासाठी नायगाव शाखेत स्लिप भरून दिली आहे. मात्र, मेनकुदळे यांना आजतागायत छदामही मिळाला नाही. शाखेत चलन उपलब्ध नाही, असे बँक अधिकारी कारण देत असल्याचे संबंधित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.देवळाली येथील साहेबराव पांडुरंग लोमटे यांंना २२ एप्रिल रोजी तूर विम्यापोटी ५४ हजार रूपये आले आहेत. रोख स्वरूपात विमा देण्यासाठी चलन नसेल तर ‘आरटीजीएस’ अथवा ‘एनएफटी’द्वारे पेमेंट ट्रान्सफर करावे, अशी विनंती त्यांनी केली. परंतु, ढोकी शाखेकडून नकार देण्यात आला. यासंदर्भात त्यांनी उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली असता ‘आरटीजीएस’ करण्याचे आदेश दिले. असे असतानाही बँकेकडून अद्याप न्याय मिळाला नाही, असे शेतकरी लोमटे सांगतात. यांच्यासोबतच अनेक शेतकरी पैसे मिळत नसल्याने हवालदिल आहेत.
पैसे काढण्याची स्लिपही मिळेना?सौंदणा येथील शेतकरी अरविंद मनोहर लोंढे यांनी मोहा शाखेअंतर्गत विमा भरला होता. आपल्या खत्यावर किती पीक विमा मंजूर झाला आहे? हे पाहण्यासाठी संबंधित शेतकरी बँकेत गेले होते. यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांकडून विमा भरल्याची पावती आणा, त्यानंतर तुम्हाला पैैसे काढण्याची स्लिप दिली जाईल असे सांगितले. बँकेकडून विमा रक्कम वितरित करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हैैराण झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे चलन तुटवड्याच्या नावाखाली जिल्हा बँक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे रोख स्वरूपात देण्यास असमर्थता दर्शवित आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील प्रश्नी लक्ष घालून शेतकऱ्यांना विमा तातडीने वितरित करण्याच्या अनुषंगाने आदेशित करावे. तसेच चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवावेत. अन्यथा बँकेच्या विरोधात आंदोलन करू.-संजय पाटील दुधगावकर, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.