कळंब - बहुला येथील मांजरा नदीच्या पात्रात जलसंधारण कार्यालयाने नदीचे खोलीकरण सुरू होते. सदर खोलीकरणाच्या कामात ‘खोलीचा अभाव’ असल्याने याची पावसाळ्यापूर्वी ग्रामस्थांच्या समक्ष त्रयस्थ तपासणी करावी अशी मागणी ग्रा.पं.ने केली आहे.
बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमारेषा बनून प्रवाही होणारी मांजरा नदी बहुला शिवारामधून कळंब तालुक्यात प्रवेशित होते. पुढं याच नदीकाठावर बहुला, आढळा, खोंदला, आथर्डी, सात्रा, कळंब, भाटसांगवी आदी गावांचा शेत शिवार येतो.
शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही मांजरा नदी मागच्या काही वर्षात झाडाझुडपात लुप्त झाल्यासारखी दिसत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी प्रवाहमार्गात अनावश्यक भराव निर्माण झाले आहेत. यामुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात अपेक्षित असा पाणीसाठात राहत नसल्याने याचा शेतीस फटका बसतो.
दरम्यान, याच नदीवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २०१८ मध्ये खोलीकरण व फेजरयुक्त दारासह बंधारे बांधण्याच्या जवळपास पाच कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली. याची ई निविदा प्रक्रिया राबवत, याचा ठेका मुंबई स्थित एका कंपनीला देण्यात आला आहे.
यानुसार मागच्या काही महिन्यांपूर्वी नदीचे खोलीकरण हाती घेतले होते. सदर काम करताना तांत्रिक मापदंडानुसार काम होत नसून रूंदी,खोली,भराव यासंदर्भात अनेक अनियमितता आहेत अशी तक्रार ग्रा.पं व शेतकऱ्यांनी केली होती.
चौकट...
खोलीकरणात खोलीचा अभाव...
बहुला येथे मांजरा नदीवर मध्यंतरी खोलीकरण करण्यात आले आहे. यासंदर्भात आश्रुबा बिक्कड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर जात कामाची पाहणी करत खोलीची मोजणी केली असता ती फूट ते दीड फूट दिसून आली. यामुळे ग्रामपंचायतने विशेष ठराव घेऊन याबाबत संबंधित विभागाला अवगत केले होते.
पाणी वाहून जाण्यापूर्वी पडताळणी करा...
दरम्यान, बहुला ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं सदस्यांनी यासंदर्भात नुकतीच सदर खोलीकरण झालेल्या कामाची पावसाळ्यापूर्वी त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करावी अशी मागणी केली आहे. अंदाजपत्रकात एका कामात एक किमी लांबीमध्ये ४५ मीटर रूंद व दीड मीटर खोल खोदकाम अपेक्षित असल्याचे समजते. यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून गेल्यास काम केलं आहे की नाही याची खातरजमा होणार नसल्याचे यात नमूद केले आहे. यावर सरपंच आशा आश्रूबा बिक्कड, उपसरपंच सुरेश शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुदत सरून ही एकही काम झाले नाही...
जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयाने बहुला येथे मांजरा नदीवर फेजरयुक्त द्वारासह चेक डेम बांधकाम करण्याची तीन कामे मंजूर केली होती. याची किंमत ४ कोटी ९१ लक्ष एवढी आहे.यात जिएसटी, रॉयल्टी यांचे १ कोटी ७५ लाख वजा जाता कामावरील खर्च ३ कोटी १५ लाख एवढा आहे. विशेष म्हणजे एककीडे ई निवेदेत बहुतांश कामे ‘बिलो’ जात असताना या कामाचा ३.५० टक्के ‘अबोव्ह’ दराने ठेका मंजूर झाला आहे. यामुळे ३ कोटी १५ लाखांऐवजी कामाचा खर्च ३ कोटी २७ लक्ष होणार आहे. या कामाला मार्च २०१९ मध्ये २४ महिने मुदतीचा कार्यारंभ आदेश दिला होता. मात्र मुदत संपली तरी एकही चेक डेम पूर्ण झालेला नाही.