- गणेश कुलकर्णीलोहारा : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अन् सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील युनियन बँकेचे खातेदार असलेल्या एक हजार ६९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर विम्याचे पैसे जमा झाले. परंतु, तेही अल्प आणि असमान असल्याने शेतकऱ्यांमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’ दिसून येत आहे.
यावर्षी जिल्ह्यातील युनियन बँकेचे खातेदार असलेल्या एकूण तीन हजार २३४ शेतकऱ्यांना पीकविम्याचा एक रुपयाही दिला नव्हता. यात लोहारा तालुक्यातील युनियन बँक खातेदारांची संख्या एक हजार ६९८ इतकी होती. दरम्यान, विभागस्तरीय बैठकीत विभागीय आयुक्त यांनी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी युनियन बँकेच्या खातेदारांना दोन आठवड्यात पीकविमा देण्याचे आदेश दिले होते. यानुसार आदेशाचा कालावधी पूर्ण होण्यास एक दिवस कमी असतानाच पीकविमा कंपनीने युनियन बँकेच्या खातेदारांना पीकविमा अदा केला. परंतु, भातागळी येथे एकाच सर्व्हे नंबरमध्ये एकाला १४०० रुपये, तर एकाला १५ हजार रुपये अशी असमान रक्कम देण्यात आली आहे. अन्य ठिकाणीही असाच प्रकार घडल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी अवस्था आहे.