काक्रंबा : सध्या महावितरणकडून थकीत वीज बिलाची जोरादार वसुली सुरू करण्यात आली असून, मार्चनंतर कनेक्शन कट करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. दरम्यान, महाविरतणने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेबाबत सार्वजनिक ठिकाणी फलक लावून जनजागृतीही केली जात आहे.
सध्या गहू, मका, कांदा, उन्हाळी भुईमूग, ऊस, भाजीपाला पिकासह आंबा, द्राक्षे, चिकू, पेरू, डाळिंब आदी बागांना पाण्याची नितांत गरज आहे. असे असतानाच महावितरणकडून ही वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. घरगुती वीज वापर करणाऱ्या थकित ग्राहकांची यादी ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर लावण्यात आली असून, सध्या लाईनमन घरोघर जाऊन वीज बिल भरण्यासंबंधी आवाहन करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना सवलतीच्या योजनेचा लाभ दिला जात आहे. परंतु, मार्चएन्डमुळे शेतकरी इतरही कर्जे नवे-जुने करण्याच्या धावपळीत असून, त्यातच वीज बिलाची वसुलीही सुरू झाल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे.
कोट........
आमच्याकडे पन्नास ते साठ हजार बिल थकीत आहे. मात्र, गेले वर्षभर कोरोनामुळे शेत मालाला चांगली बाजारपेठ मिळत नाही. तसेच पिकवलेल्या धान्याला भावही मिळत नाही. त्यातच यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीच वाहून गेल्या. त्यामुळे वीज बिलात सवलत मिळण्याची गरज आहे.
- पद्मराज गडदे, शेतकरी काक्रंबा
वीजबिल भरलेच पाहिजे. यात दुमत नाही. मात्र, महावितरणकडून चोवीस तासांपैकी आठ तासच शेतीसाठी वीज मिळते. यातही अनेकदा रोहित्र बंद झाल्यास किंवा कुठे बिघाड झाल्यास व्यत्यय येतो. यामुळे सलग आठ तास वीज उपलब्ध होत नाही.
- संजय सोनटक्के, शेतकरी काक्रंबा
सध्या थकीत वीज बिलाची वसुली सुरू करण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांना घरोघरी जाऊन बिल भरणा करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. शिवाय, शेतकऱ्यांसाठी महा कृषी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ५० ते ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन महावितरणला सहकार्य करावे.
- शिरीष कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, उपकेंद्र, तुळजापूर
गावातील प्रवेशद्वारावर अशी फ्लेक्स लावून महावितरणकडून जनजागृती करण्यात येत आहे.