पित्याचे आर्जव फळले, पुत्राची भाजपात एंट्री; प्रदेश सचिव सुनील चव्हाणांचा काँग्रेसला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 06:53 PM2024-04-20T18:53:47+5:302024-04-20T18:55:54+5:30
गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घरगुती कारणामुळे राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले आहे. यानंतर लागलीच शुक्रवारी महायुतीच्या धाराशिव येथील सभेत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
धाराशिव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र प्रदेश सचिव सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे. १६ एप्रिलला मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात घेतलेली भेट फळल्याने सुनील चव्हाणांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री बसवराज पाटील व मधुकरराव चव्हाण हे दोनच दिग्गज नेते काँग्रेसमध्ये होते. बसवराज पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. तर आता शुक्रवारी मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपवासी झाले. मधुकरराव चव्हाण हे दीर्घकाळ तुळजापूरचे आमदार राहिलेले आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पराभूत झाले. हल्ली प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पूर्णवेळ सक्रिय नाहीत. महाविकास आघाडीच्या बैठकांनाही ते अनुपस्थित होते.
१६ एप्रिलला फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी पुत्राचा मार्ग सुकर करून दिला. सुनील चव्हाण हे काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदावर कार्यरत होते. त्यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घरगुती कारणामुळे राजीनामा देत असल्याचे पत्र पाठविले आहे. यानंतर लागलीच शुक्रवारी महायुतीच्या धाराशिव येथील सभेत त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, मधुकरराव चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी आपण काँग्रेसमध्येच राहू, असे स्पष्ट केले होते. आता ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.