उमरगा : महाविद्यालयीन जीवनातील सवंगड्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलींच्या नावे नव्वद हजार रुपयांची रक्क़म बँकेत ठेव स्वरूपात ठेवत या कुटूंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत वर्गमित्रांनी समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
कोराळ (ता. लोहारा) येथील मातोश्री काशीबाई बिराजदार विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले प्रदीप काळे यांचे दीड महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. ही शाळा कायम विनाअनुदानित असल्याने काळे हे तेथे गेली पंधरा वर्षे विनावेतन काम करीत होते. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले होते. असे असतानाच ९ नोव्हेंबर रोजी तञयांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने तसेच उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने हे कुटूंब आर्थिक संकटात सापडले होते. त्याच वेळी त्यांच्या वर्गमित्रांनी या कुटूंबाला मदत देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी ‘बी.एससी’ या समाजमाध्यम ग्रुपवर मदत करण्याचे आवाहन केले होते. सदर आवाहनाला प्रतिसाद देत बी.एससी. १९९७-२००० या वर्षातील वर्गमित्र, उमरगा गणित मंडळ व दाळींब केंद्र या ग्रुपमधील सदस्यांनी जवळपास नव्वद हजार रुपये वर्गणी गोळा करुन प्रदीप काळे यांच्या दोन्ही मुलींच्या अनुक्रमे पन्नास व चाळीस हजार रुपये पुढील भवितव्यासाठी बॅंकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवले. पतीच्या निधनानंतर पतीच्या महाविद्यालयीन मित्राकडून झालेली मदत पाहुन मीरा काळे भारावून गेल्या. यावेळी बॅंकेचे शाखाधिकारी जयवंत कोकाटे, वर्गमित्र जाफर मुल्ला, प्रदीप भोसले, खाजा मुजावर, शंकर बिराजदार, कनिष्ठ अधिकारी विजय कुलकर्णी, कनिष्ठ लिपिक धिरज मुगळीकर, सुरज देशपांडे, रोखपाल उदय जोशी, सेवक लिंबाजी अंबुलगे, मीरा काळे आदी उपस्थित होते.
मोठा आधार मिळाला
पती गेली पंधरावर्षे विनावेतन काम करत होते त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कुटूंबावर मोठे संकट आले होते. पतीच्या महाविद्यालयीन व सहकारी मित्रांनी केलेली मदत अनमोल असून, यामुळे भविष्यात जगण्यासाठी आधार मिळाल्याची भावना मीरा काळे यांनी यावेळी बोलून दाखविली.