उस्मानाबाद : भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांच्यावर मंगळवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, त्यांच्या संपत्तीची चौकशीही सुरू झाली आहे.
परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तक्रारदारास वाळू उपसा व वाहतूक विनाकारवाई करू देण्यासाठी भूमच्या उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांनी कोतवाल विलास जानकर याच्यामार्फत १ लाख १० हजार रुपये लाच मागितली होती. शेवटी ९० हजारांत तडजोड करून, पहिला हप्ता २० रुपये देण्यास सांगितले. हा हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री कोतवालास रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळ होताच, मनिषा राशीनकर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना भूम येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती लाचलुचपतचे उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी दिली.
नगरमधील घराचीही झडती...
उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर या मूळच्या नगरच्या आहेत. इकडे मंगळवारी रात्री कारवाई होताच, तिकडे एका पथकाने नगरमधील घराची झाडाझडती सुरू केली, तसेच दुसऱ्या पथकाने भूम येथील त्यांच्या निवासस्थानी संपत्तीची चौकशी सुरू केली. बुधवारीही दिवसभर राशीनकर यांच्या संपत्तीची माहिती एकत्र करण्यात पथके व्यस्त होती. या झाडाझडतीतून किती बेनामी संपत्ती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.