उस्मानाबाद : शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत असताना एका महिला पोलीस उपनिरीक्षकास त्यांच्या राहत्या घरातून खाली ढकलून देत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॉन्स्टेबलला ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी न्यायालयाने सुनावली आहे. या बहुचर्चित प्रकरणाला तपासातून वेगळे वळण मिळाले होते. ( The female sub-inspector was pushed from the fourth floor by constable, incident from Osmanabad )
मनीषा रामदत्त गिरी या महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर ठाण्यात कार्यरत होत्या. तेव्हा याच ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या आशिष ज्ञानाेबा ढाकणे याच्याशी त्यांचा परिचय झाला होता. त्यानंतर गिरी यांची शहर ठाण्यात बदली झाली होती. त्यानंतर ३१ मे २०१९ रोजी सकाळी गिरी या राहत असलेल्या घरातील चौथ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी आनंदनगर ठाण्यात त्याच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद करून घेण्यात आली. मात्र, पोलीस तपासात हा प्रकार आत्महत्येचा नसल्याचे लक्षात आले होते. जखमी मनीषा गिरी या शुद्धीत नसल्याने तपासाला पुरेशी गती मिळू शकत नव्हती.
जवळपास महिनाभराने त्या ठणठणीत झाल्यानंतर २९ जून २०१९ रोजी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. आशिष ढाकणे याने गिरी यांना चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे जबाबातून स्पष्ट झाल्यानंतर तपास पथकाने त्यास तातडीने ताब्यात घेतले आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यावर नोंदविण्यात आला. गेली २ वर्षे तो काेठडीतच आहे. या प्रकरणाचा तपास उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मनीषा गिरी यांचा जबाब, तपास पथकाने जमा केलेले सबळ पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आशिष ढाकणे यास खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरत ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने आरोपीस सुनावला.