वाशी : खताची भाववाढ व कडधान्य आयातीस विरोधात दर्शवित प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
भारत सरकारने सन २०२०-२१ साठी कडधान्य आयात खुली केली आहे. याची अधिसूचना १५ मे २०२१ ला काढली आहे. मागील तीन वर्षांपासून कडधान्य हे प्रतिबंधित वर्गवारीत होते. ते आता खुल्या वर्गवारीत आल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार असून तूर, मूग, उडिदासह इतर कडधान्यांचे भाव आता वाढणार नाहीत. उलट हमीभावाच्याही खाली हा भाव येऊ शकतो. हा भाव नियंत्रित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षीपासून कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत असतानाच शासनाने यंदा खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ कमी करावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. यावर प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हेमंत उंदरे, सर्जेराव उंदरे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.