उस्मानाबाद : गोवर हा मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि नंतर अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही.
२०१८ मध्ये राज्यभरात शालेय स्तरावर १५ वर्षांपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये गोवर, रुबेलाचे ‘एमआर’ लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे गोवर, रुबेला रोखण्यात आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. असे असले तरी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांना तापासोबतच अंगावर पुरळ आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले.
असे केले जाते निदान
कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गोवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
त्यामुळे पुरळ आल्यापासून सात दिवसांत रुग्णाचे रक्तजल नमुने तसेच घशाचा स्वॅब किंवा लघवीचे नमुने तपासले जातात.
जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करून रोग निदान करण्यात येत आहे.
गोवर होण्याची कारणे
गोवर हा रोग विषाणूमुळे होतो. हा आपल्यासारख्या उष्ण वातावरणात पार काळ तग धरू शकत नाही; पण थंड वातावरणात तो बराच काळ राहू शकतो.
गोवरचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो. विषाणूप्रवेशानंतर साधारणपणे आठ-दहा दिवसांत गोवरची लक्षणे दिसू लागतात.
...तर डाॅक्टरांना दाखवा
गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.
यात तापासह खोकला, वाहणारे नाक आणि डोळ्यांची जळजळ ही लक्षणे आहेत. वाढत जाणारा ताप पुरळ उठायचा थांबल्यावर लगेच शमतो. भूक मंदावते. दोन किंवा तीन दिवसांनंतर तोंडात पांढरे डाग दिसताच डाॅक्टरांशी संपर्क साधावा.
कोट...
रुग्णाला तापासोबतच पुरळ असल्यास ते गोवर रुबेलाची लक्षणे कुठल्याही वयोगटातील वयोगटातील रुग्णांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.
डॉ. धनंजय पाटील,
जिल्हा शल्य चिकित्सक