उस्मानाबाद : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२०-२१ अंतर्गत अनुदानित बियाणांसाठी पावणेसतरा हजार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यापैकी केवळ सव्वादोन हजार शेतकऱ्यांना लॉटरी लागली असून, उर्वरित शेतकऱ्यांना आता बाजारभावानुसार बियाणे खरेदी करावे लागणार आहे.
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून, यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत १६ हजार ७४४ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी २ हजार ३०६ शेतकऱ्यांनाच लाॅटरी लागली आहे. या शेतकऱ्यांना १७७१.४० क्विंटल बियाणे वितरित करण्यात येणार आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांना आता बाजारभावानुसार बियाणे खरेदी करावे लागणार आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव आले आहे, त्यांना मोबाईलवर शासनाकडून मेसेज देण्यात येणार असल्याची माहिती कळविण्यात आली आहे. लवकरच तालुकास्तरावरून या शेतकऱ्यांना बियाणे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी तयारीही पूर्ण झाली आहे.
महागडे बियाणे कसे परवडणार?
सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा
सोयाबीन बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली होती. मात्र, लॉटरीत नाव आलेले नाही. बियाणांचे भाव प्रतिदिन वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे.
- विशाल जमाले, शेतकरी, कसबे तडवळे
महागाईने कळस गाठला
महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीन बियाणांसाठी नोंदणी केली होती. मात्र, सोडतीत नाव आलेले नाही. गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीन बियाणे महागले आहे. ३० किलोची बॅग तीन ते साडेतीन हजार रुपयांना मिळत आहे. महागाईने कळस गाठला असून, शासनाने बियाणांचे दर नियंत्रणात ठेवावेत.
- सुधीर लाकाळ, शेतकरी, पळसप
योजना समजून सांगणे गरजेचे
शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, त्यांची म्हणावी तशी जनजागृती होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. बियाणांसाठी अर्ज केला होता, मात्र, सोडतीत नाव आलेले नाही.
- गोविंद लोमटे, शेतकरी, कावळेवाडी,
कोणत्या तालुक्यात किती अर्ज...
उस्मानाबाद ५६३
तुळजापूर ४४९
उमरगा २८४
लोहारा १६४
भूम १९४
परंडा १७
वाशी २४९
कळंब ३८६
अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज : १६७४४
लॉटरी किती जणांना : २३०६