कळंब : येथील नगरपरिषद व धनेश्वरी शिक्षण समूहाच्या पुढाकारातून कळंब येथे कोविड केअर सेंटर चालू करण्यास जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. जिल्हा प्रशासनाने यासाठी परवानगी दिलीही; परंतु परवानगी पत्रात न. प. चा काहीच उल्लेख नसल्याने ते चालू कसे करायचे, असा प्रश्न आता न. प. प्रशासनासमोर आहे. त्यामुळे यासाठी सुधारित प्रस्ताव पाठविला असून, यास लवकरच मंजुरी मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कळंब तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एकवेळ हजाराच्या घरात पोहोचली होती. अनेकांना ऑक्सिजन बेड तर दूर पण साधे बेडही मिळत नव्हते. सध्या कळंब येथील चार कोविड सेंटरमध्ये १७० कोविड रुग्ण उपचार घेत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही पाचशेच्या घरात आहे.
कोरोनाची तालुक्यातील विद्यमान परिस्थिती व संभाव्य कोरोना लाट आली तरी तालुक्यातील नागरिकांना कळंब येथे किमान प्राथमिक उपचार मिळावे यासाठी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, धनेश्वरी संस्थेचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ५० खाटांचे कोविड सेंटर चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. या ठिकाणी पाणी, वीज, वैद्यकीय सुविधा, आहार व स्वछता याचे नियोजन प्रशासनाच्या निकषानुसार करण्याचेही त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
या आणखी एक कोविड सेंटरमुळे कळंब तालुक्यातील कोविड रुग्णांना उपचार मिळण्यास सुलभता मिळणार होती.
त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने ११ मे रोजी नगर परिषद व धनेश्वरीच्या संयुक्त प्रस्तावाला मंजुरी देताना भैरवनाथ अध्यापक विद्यालय डिकसळ (ता. कळंब) येथील ५० खाटांच्या कोविड सेंटरच्या नावाने आदेश काढला. परंतु, या आदेशामध्ये ‘नगरपरिषद’चा कोठेच उल्लेख करण्यात आला नाही. तसेच या कोविड सेंटरच्या देखभालीसाठी सर्व निर्देश शासकीय वैद्यकीय यंत्रणेला दिले.
या आदेशामध्ये ना नगरपरिषदवर काही जबाबदारी आहे ना धनेश्वरी संस्थेवर. त्यामुळे आदेश तर पारित झाला, पण तांत्रिकदृष्ट्या याची जबाबदारी घ्यायची कोणी, हा प्रश्न आहे. प्रशासनाने आदेशात ज्या यंत्रणावर ही जबाबदारी टाकल, त्यांनीही अजून हे कोविड सेंटर कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे कागदावर मंजूर झालेले हे कोविड सेंटर आणीबाणीच्या वेळी किंवा घाईगडबडीत सुरू करण्यापेक्षा या सेंटरची जबाबदारी संबंधितावर नमूद करून हे कोविड उपचार केंद्र त्वरित कार्यरत करावे, अशी मागणी आता पुढे येत आहे. दरम्यान, यासाठी पुन्हा सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला असून, याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.
चौकट -
उत्तम सुविधा देऊ -नगराध्यक्षा मुंडे
कोविड सेंटरला मंजुरी मिळाली होती. पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचण होती. त्या बाबी आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे त्यांनी सुधारित प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळताच तत्काळ कोविड केअर सेंटर सुरु करून याठिकाणी उत्तम सुविधा देऊ, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी दिली.
चौकट -
प्रस्ताव मंजुरीकडे लक्ष
कळंब न. प. व धनेश्वरी संस्थेने संयुक्त कोविड सेंटरचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूरही झाला. मात्र, त्यामध्ये न. प. तसेच धनेश्वरी संस्थेचा उल्लेख नव्हता. या सेंटरसाठी न. प. कोणत्या आधारे खर्च करणार? त्याचे ऑडिट कसे करणार? असे प्रश्न उभा राहिले. ही तांत्रिक अडचण आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यापुढे मांडली. त्यांनी याची दखल घेऊन सुधारित प्रस्ताव पाठविला आहे. त्याच्या मंजुरीची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सांगितले.
चौकट -
कोविड सेंटरला सहकार्य करणार : गिड्डे
कळंब येथे शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने न. प. ५० खाटांचे कोविड सेंटर उभारत आहे. ही महत्त्वाची आणि गरजेची बाब आहे. या कोविड सेंटरला आमची संस्था तसेच तालुक्यातील इतरही सामाजिक संस्थाही सहकार्य करतील, अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे-पाटील यांनी दिली.