कळंब ( उस्मानाबाद) : जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन तर वाशी तालुक्यातील अन्य बँकांच्या दोन शाखाधिकाऱ्यांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यात पीककर्जाचे वाटप अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे़. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राधाकृष्ण गमे यांनी बँकांना तंबी दिली होती. त्यानंतरही पीकर्ज वाटपाची गती वाढली नाही़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी गमे यांनी बुधवारी कळंब, वाशी तालुक्यात आढावा बैठक घेतली होती़ या बैठकीत पीककर्ज वाटपात दिरंगाई करीत असलेल्या बँक शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़.
या अनुषंगाने कळंब येथील सहायक निबंधक बी़एस़ कटकधोंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय स्टेट बँकेच्या कळंब शाखेचे व्यवस्थापक कृष्णकांत मारुती काळे, अंदोरा शाखेचे महेश आनंदगावकर व मंगरुळ शाखेचे एम़व्ही़ वेदपाठक यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
वाशी तालुक्यातही गुन्हा दाखल दरम्यान, वाशी तालुक्यातही भारतीय स्टेट बँकेचे वाशी शाखेचे व्यवस्थापक अमित ओव्हाळ व बँक आॅफ महाराष्ट्र शाखा पारगावचे शाखाधिकारी अनुज टोपो यांच्यावर सहायक निबंधक के़एस़ बारकूल यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याशिवाय, तेरखेडा येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे बारकूल यांनी सांगितले़