- बालाजी बिराजदारलोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा पंचायत समितीचे बीडीओ सोपान अकेले यांची बदली करा अशी मागणी सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात येत होती. या मागणीला अखेर नऊ महिन्यानंतर न्याय मिळाला असून बीडीओ अकेले यांची बदली बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) पंचायत समितीला करण्यात आहे.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे पंचायत समिती कार्यालयात आल्यावर अपमानकारक बोलतात व वृक्ष लागवड तसेच महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामासाठी जानुबूजुन आडवणूक करत पैशाची मागणी करतात पैसे नाही दिल्यास मस्टर काढत नाही. अशी धमकी देतात. त्याच बरोबर पंधराव्या वित्त आयोगाचे डीएसी काढण्यासाठी वारंवार टाळाटाळ करतात. त्यात गावस्तरावरील विकास कामे करण्यास जाणुन बुजुन आडथळा निर्माण करतात. असा आरोप सरपंच ग्रामसेवकांनी करत आंदोलने निवेदने दिली.
त्यानंतर २६ जूनला अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी अंती गटविकास अधिकारी अकेले हे १ जुलै ते ३१ जुलै या महीनाभरासाठी रजेवर गेले. त्यानंतर ते परत २ ऑगस्ट रोजी रुजू झाले आणि पुन्हा कोणते ही कारण पुढे करत ग्रामसेवकांना त्रास देत असल्याचे आरोप करीत त्याची बदली करा या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने १० ऑगस्ट पासुन असहकार आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी यांनी ही बदली मागणी शासनाकडे होती. अखेर ९ मार्च रोजी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने बीडीओच्या बदलीचे पत्र काढले असून त्याची बदली बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) पंचायत समितीला करण्यात आली आहे.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करावी यासाठी वेळोवेळी निवेदने आंदोलने करण्यात आली अखेर आमच्या मागणीची दखल घेत बदली करण्यात आली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अभार आहोत.- एम.टी.जगताप, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन
लोहारा पंचायत समितीचे बीडीओ सोपान अकेले हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सरपंच,ग्रामसेवक,सदस्य, शिक्षक,कर्मचारी यांना सतत त्रास देत होते. यासंदर्भात आम्ही आवाज उठवून बदलीची मागणी लावून धरली अखेर त्यांची बदली झाली असून आमच्या लढ्याला राज्य सरकारने न्याय दिला. - मोहन पणुरे, जिल्हा समन्वयक, सरपंच परीषद मुंबई