उस्मानाबाद : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यक्ती मत्स्यव्यवसायाकडे वळत आहेत. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय हा पर्जन्यमानावरच अवलंबून आहे. मात्र, मागील तीन- चार वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने मत्स्यव्यवसायाला फटका बसला होता. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे. २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्ह्यास २२ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारीअखेरपर्यंत सुमारे १८०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. या व्यवसायातून ५ हजार कुटुंबाना रोजगार मिळू लागला आहे.
जिल्ह्यात सुमारे १८ हजार ९५३ हेक्टर जलक्षेत्र आहे. सदरील जलक्षेत्रात १७५ सहकारी मच्छीमारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय केला जातो; परंतु मागील काही वर्षांतील पर्जन्यमानावर नजर टाकली असता दोन-तीन वर्षांआड दुष्काळी स्थिती उद्भवत आहे. त्यामुळे एक-दोन वर्षे मासेमारी झाली की, तिसऱ्या वर्षी व्यवसाय गुंडाळण्याची वेळ संबंधित संस्थावर येत होती. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे अनेक मत्स्य सहकारी संस्थांनी जून ते ऑगस्ट या महिन्यात प्रकल्पात मस्त्यबीज सोडले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून उत्पादन सुरू झाले. अद्यापपर्यंतही अनेक प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत १८०० मेट्रिक टन उत्पादन मिळाले आहे. मार्चअखेरपर्यंत उत्पादन २२०० मेट्रिक टन उत्पादन होऊ शकते, असे मत्स्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात १७५ मत्स्य सहकारी संस्था कार्यरत असून, १ संस्थेत २५ ते ५० जणांचा समावेश असतो. सध्या जिल्ह्यात ५ हजारांच्या जवळपास कुटुंबे मासेमारी व्यवसाय करीत आहेत.
चौकट...
पाटबंधारे विभागाचे २३६ तलाव व पाटबंधारे विभागाचे १ हजार तलाव मत्स्यविभागाने मस्त्यबीज संचयनासाठी हस्तांतरित केलेले आहेत. यंदा जून ते ऑगस्टदरम्यान या तलावात सव्वा तीनशे लाख मत्स्य बोटूकली सोडण्यात आली आहे. यात कटला, राेहू, मृगल, सिप्रिनस आदी प्रकाराच्या मत्स्यांचा समावेश आहे. सध्या या माशांची विक्री केली जात आहे.
चांदणीच्या केंद्रातून मस्त्यबीजाचा पुरवठा
मागील तीन वर्षांपासून परंडा तालुक्यातील चांदणी येथील मत्स्यबीज निर्मिती केंद्र पाण्याअभावी २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत बंद होते. २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात पाऊस झाला; परंतु या वर्षातही अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते. यंदा मान्सूनमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या केंद्रात बाहेरून मत्स्यजीरे आणून संस्थांना पुरवठा करण्यात आला. या केंद्रातील प्रजनक मासळी साठा इतर जिल्ह्यात स्थलांतरित केला होता. या वर्षी पाणीसाठा झाल्याने प्रजनक मासळी साठा संकलित करून जूनपासून हे केंद्र कार्यान्वित होणार आहे.
कोट....
प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असल्याने सव्वा तीनशे लाख मत्स्यबीज प्रकल्पात सोडण्यात आले होते. त्यामुळे उत्पानही वाढले आहे. या वर्षी २२०० मेट्रिक टनाचे उद्दिष्ट होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत १७८० मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. मार्चअखेरपर्यंत २२०० मेट्रिक टन उत्पादन होणे अपेक्षित आहे. पावसाळी हंगामात १ लाख ५५ हजार महसूल मिळाला असून, शासनाकडे जमा केला आहे.
-डी.एम. वाघमोडे, मत्स्य विकास अधिकारी
मागील पाच वर्षांत झालेले उत्पादन
वर्ष उद्दिष्ट उत्पादन
२०१८-१९ २००० १६००
२०१९-२० २२०० १२००
२०२०-२१ २२०० १७८०