उस्मानाबाद : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यास विलंब झाला, तसाच प्रकार आयटीआयबाबतही घडलेला असला तरी आता आयटीआयची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, यावर्षी सर्वाधिक प्रवेश हे फिटरच्या ट्रेडला होत आहेत. एकूण झालेल्या प्रवेशांपैकी ७० टक्के विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेशित झाले आहेत.
जिल्ह्यात सरकारी ८ व खाजगी ९ अशा एकूण १७ आद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. सरकारी आयटीआयची प्रवेशक्षमता १ हजार ६५६ इतकी आहे. तर खाजगी आयटीआयची प्रवेश क्षमता ५७२ आहे. अशी एकूण २ हजार २२८ प्रवेशक्षमता आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटार मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, सर्व्हेअर, एआरएसी, इलेक्ट्रान्स मेकॅनिकल, वेल्डर तसेच मुलींसाठी ड्रेस मेकिंग, बेसिक काॅस्मोटोलाॅजी आदी ट्रेड्स उपलब्ध आहेत. दरवर्षी सर्वच ट्रेडला विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटरला ७० टक्के विद्यार्थी पसंती दर्शवित आहेत.
यंदा अद्यापपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. २५ व २६ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना संकेतस्थळाला भेट देऊन जिल्हा निवड करता येणार आहे. २९ व ३० डिसेंबर रोजी प्रवेश निश्चित होणार आहेत. १ जानेवारीपासून आयटीआय काॅलेज प्रत्यक्ष सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार आहेत. शिवाय वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन बेंचमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे.
११५० जागा भरल्या...
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून आयटीआय प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. अद्यापपर्यंत चार फेऱ्या झाल्या असून, एकूण प्रवेशक्षमतेच्या ५० टक्के म्हणजे, सुमारे १ हजार १५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पाचवी फेरी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या फेरीत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना २९ व ३० डिसेंबर रोजी प्रवेश घेता येणार आहेत.
कारपेंटर, गवंडीकामाकडे पाठ...
यंदा आयटीआयला विद्यार्थ्यांचा कल हा पारंपरिक इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर या ट्रेडला अधिक आहे. प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थ्यांनी या ट्रेडला प्रवेश घेतला आहे. कारपेंटर, गवंडी काम या ट्रेडकडे मात्र विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली.