कळंब : चोरीला गेलेल्या एका गाडीचा तपास करताना कळंब पोलिसांना दुचाकी चोरांची टोळी व सात दुचाकी हाती लागल्या होत्या. यानंतर गुरुवारी या टोळीने लंपास केलेल्या आणखी पाच दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
कळंब येथील अक्षय धपाटे यांची दुचाकी विद्याभवन शाळेपासून चोरीस गेली होती. याची मंगळवारी कळंब पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद झाला होता. याचा तपास पोहेकॉ सुनील कोळेकर करत होते.
त्यांनी विविध अंगाने तपास करत तपासाला दिशा दिली होती. यावेळी त्यांच्यासह पोकॉ फरहानखान पठाण, मिनहाज शेख, शिवाजी राऊत, सुनील हंगे, शिवाजी शिरसाठ यांच्या पथकाने पोनि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद केले होते.
यावेळी एकूण सात दुचाकी हस्तगत केल्या होत्या.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या लखन दळवे यांच्यासह चौघे सध्या दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत आहेत. तपासाधिकारी सुनील कोळेकर हे त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत. तपासला योग्य दिशा दिल्याने गुरुवारी कोळेकर, फरहानखान पठाण यांनी आणखी पाच दुचाकी कळंब शहरातील डिकसळ भागातून हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
चौकट...
त्यांची 'हिरो' ला जास्त पसंदी...
कळंब येथे ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी चोरांच्या चौकडीकडून ताब्यात घेतलेल्या एकूण १२ गाड्या आहेत. यातील सर्व दुचाकी ‘हिरो’ व ‘हिरो होंडा’ कंपनीच्या असून, सर्वांचे रंग काळे, निळसर आहेत. यामुळे ठराविक रंगाच्या व कंपनीच्या दुचाकी चोरी करण्यामागचा त्यांचा ‘विशेष’ हेतू चर्चेचा विषय ठरला होता.
सव्वा कोटीच्या गांजाचे आरोपी फरारच...
दरम्यान, मस्सा (खं) येथे मंगळवारी कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेला तब्बल सव्वा कोटीचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला होता. याप्रकरणी दोघांवर त्याचदिवशी गुन्हा दाखल केला असला तरी अद्यापपर्यंत आरोपी सापडले नसल्याचे समजते.