उस्मानाबाद/उमरगा - जिल्हयात मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे बेनितुरा नदीला पूर आला असून उमरगा शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.
मंगळवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर रात्री रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. पावसामुळे उमरगा तालुक्यातून वाहणाऱ्या बेनितुरा नदीला मोठा पूर आला आहे. तसेच उमरगा शहरातील गुंजोटी रोड परिसरता पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तशेच मुन्सी प्लॉट, वृंधांवन नगर, कुंभार प्लॉट, जुनी पेठ, शिंदे कॉलनी, बँक कॉलनी, औटी गल्ली भागातील अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले आहे.
तसेच कलदेव निंबाळा मार्गालगतची झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प आहे. विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा सध्या खंडित आहे. धो-धो पडलेल्या या पावसामुळे काढणी सुरू असलेले सोयाबीन तसेच उसाचे मोठे नुकसान झाले आहे.