कळंब : ‘ एक गाव, एक गणपती ’ ही संकल्पना कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतेक गावांनी अंगीकारली आहे. दरम्यान, कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले.
गणेश उत्सव संदर्भात पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गणेश मंडळांनी शक्यतो देखावे सादर न करता गणेश मूर्तीची सन्मान म्हणून स्थापना करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून अलिप्त कसे राहता येईल याची काळजी घ्यावी, असे मत उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी यावेळी व्यक्त केले. उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक अशोक पवार, कुमार दराडे, महावितरण अभियंता वैभव गायकवाड यांच्यासह विविध विभागातील पदाधिकारी, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, मोहल्ला कमिटी सदस्य आदी उपस्थित होते. बैठकीसाठी गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार श्रीराम मायंदे, युवराज चेडे, गोविंद पतंगे, बबन गलांडे यांनी परिश्रम घेतले. श्रीराम मायंदे यांनी गणेश स्थापना करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.