तुळजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिरात ‘नो मास्क नो एन्ट्री’ यासह इतर नियमांचे कडक पालन करावे. अन्यथा प्रशासनाला उपाययोजनांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिला. सध्या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंदिर प्रशासन कार्यालयात देखील कोरोनाने प्रवेश केला आहे . यामुळे मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी एक परिपत्रक काढून देवी भाविक, पुजारी व शहरवासीयांसाठी प्रतिबंधक नियम पाळण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने मंदिर संस्थाननेही मंदिर व मंदिर परिसरात ‘नो मास्क नो एन्ट्री’ हा आदेश जारी केला आहे. त्यामुळे प्रत्येक पुजारी, भाविक, व्यापारी व शहरवासीयांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे. याकडे दुर्लक्ष झाल्यास मंदिर संस्थानला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे ते म्हणाले. यावेळी विश्वस्त तथा नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे व मंदिर कर्मचारी उपस्थित होते.
नियम पाळा, अन्यथा कठोर निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:49 AM