तेर (जि. धाराशिव) -धाराशिव तालुक्यातील तेर चारगाव पाणीपुरवठा याेजना सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समजा पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या वतीने शनिवारी तेरणा धरणात उतरून पदाधिकाऱ्यांनी जलसमाधी आंदाेलन केले. यावेळी जाेदार घाेषणाबाजीही करण्यात आली.
तेर, ढोकी, तडवळे, येडशी या गावांना सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तेरणा प्रकल्पातून चार गाव पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आली. सुरूवातीचे काही वर्षे ही याेजना सुरळीत चालली. मात्र, २०२१ मध्ये याेजना बंद पडली. तेव्हापासून चारही गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ही याेजना पूर्ववत सुरू करावी, अन्यथा धरणात जलसमाधी घेऊ, असा ईशारा आम आदमी पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला हाेता. तरीही प्रशासकीय पातळीवर पाणीपुरवठा सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे शनिवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यानी धरणात उतरून जलसमाधी आंदाेलन केले. लेखी आश्वासनानंतर आंदाेलन मागे घेतले. यावेळी ढोकी पोलीस ठाण्याच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला हाेता. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही स्पाॅटवर तैनात हाेते.