कळंब (जि.उस्मानाबाद ) : शहरातील एका कोरोना लसीकरण केंद्राबाहेर धुडगूस घालून डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी नरहिरे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचा पुतण्या आहे.
कळंब शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या विजया नर्सिंग होम येथे शासनाचे कोरोना लसीकरण केंद्र आहे. डॉ. अभिजित लोंढे हे सध्या कंत्राटी डॉक्टर म्हणून शासन सेवेत आहेत. त्यांच्यावर लसीकरण झालेल्या रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बालाजी नरहिरे नावाचा व्यक्ती लसीकरण केंद्राबाहेर येऊन शिवीगाळ करत असल्याचे डॉ अभिजित लोंढे यांना समोरील मेडिकल दुकानातील कर्मचारी प्रवीण लोंढे याने सांगितले. डॉ. लोंढे यांनी बाहेर येऊन नरहिरे याला गोंधळ का घालतो, शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. यावर नरहिरे याने डॉ लोंढे यांना मारहाण करण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने नखाने बोचकारल्याने डॉ लोंढे यांच्या गळ्याला जखमाही झाल्या.
या प्रकाराने तेथे लसीकरणासाठी आलेल्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली. काही मंडळींनी हस्तक्षेप करून डॉ लोंढे यांना बाजूला काढले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शहरात डॉक्टर मंडळीमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संबंधित आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करा या मागणीसाठी डॉक्टर संघटनाचे प्रतिनिधी तसेच शहरातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव न घेता गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरल्यानंतर डॉ लोंढे यांच्या फिर्यादीवरून बालाजी नरहिरे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी माजी खासदार नरहिरे यांचा पुतण्याया प्रकरणातील आरोपी बालाजी हा माजी खासदार कल्पना नरहिरे यांचा पुतण्या आहे.विजया नर्सिंग होम समोर माजी खासदार नरहिरे यांचा बंगला आहे. लसीकरणासाठी येणारे नागरिक त्यांच्या बंगल्यासमोर वाहने लावत असल्याने पुतण्या बालाजी याने डॉ लोंढे यांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे. लोकप्रतिनिधी राहिलेल्या माजी खासदारांच्या कुटुंबियांना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांचा ऐवढा त्रास का ? असा प्रश्न आज दिवसभर शहरात चर्चेत होता.