नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही भाविक एका मिनी ट्रॅव्हल्समधून (क्र. एमएच ४१ एयू १५५४) तिरुपतीला दर्शनासाठी निघाले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे वाहन उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावानजीक आल्यानंतर सोलापूर-धुळे महामार्गावर पंक्चर झाले. चालकाने हे वाहन रस्त्याशेजारी घेऊन चाक बदलण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे आतील भाविक बाहेर येऊन रस्त्यालगत थांबले होते, तर काही जण मिनी ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस बसले होते. याच दरम्यान, औरंगाबादहून उस्मानाबादच्या दिशेने निघालेल्या भरधाव टेम्पोने (क्र.एमएच २० ईजी १५१७) मिनी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने फरफटत जाऊन काही अंतरावर उलटले. या घटनेत ट्रॅव्हल्ससमोरील बाजूस बसलेले भाविक शरद विठ्ठलराव देवरे (४४, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (४६, रा.सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५, रा.दरेगाव, ता.मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (५०, रा.दरेगाव, ता.मालेगाव) हे चौघे जागीच ठार झाले, तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७, दोघेही रा.सायने बु.) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८, रा.लोणवाडे, ता.मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सोलापूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याविरुद्ध येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच, येरमाळा ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश मुंढे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, हवालदार नितीन पाटील, सांडसे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी उस्मानाबादला पाठविले. येरमाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन तेलप यांनी सकाळी मयतांचे शवविच्छेदन केले.
भीषण, डोक्याच्या कवट्यांचा चेंदामेंदा...
हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने बरेच अंतर फरफटत गेले. ट्रॅव्हल्स ही रस्त्यालगतच्या एका शेतात शिरली, तर टेम्पो काही अंतरावर जाऊन उलटला. दरम्यान, ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस बसलेले भाविक हे दोन्ही वाहनांच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यामुळे मृतांपैकी काही जणांच्या डोक्याच्या कवट्यांचा चेंदामेंदा झाला होता. रक्त-मांसाचा चिखल घटनास्थळी पाहायला मिळाला.