उस्मानाबाद : सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. ठोक बाजारातील दरापेक्षा घराजवळ मिळणारा भाजीपाला दुपटीपेक्षा जास्त किमतीला मिळत आहे. पितृपक्षासाठी भेंडी, कारले, दोडके, काकडी, पालक अशा भाज्यांना मोठी मागणी आहे. सततच्या पावसामुळे भाज्यांची एकीकडे आवक कमी झाली आहे तर दुसरीकडे मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे दिसते आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून पितृपंधरवडा सुरू झाला. तिथीनुसार घरोघरी पितृपक्ष केले जातात. किरकोळ बाजारात गवार, कारले ४० रुपये, शेवगा ६० रुपये, गवार ८० रुपये, वांगी, दोडका, फ्लॉवर ६० रुपये किलोने मिळत आहे.
व्यापारी काय म्हणतात...
सध्या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पितृपक्ष पंधरवाड्यात भोपळा, गवार, कारले आदी भाज्यांना जास्त महत्त्व असते. भाज्यांना मागणी वाढली असली तरी आवक कमी आहे. पुढील १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहतील.
- त्रिंबक बनसोडे, भाजीविक्रेते
पितृपक्ष पंधरवडा असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे. पावसामुळे फळभाज्या व भाजीपाल्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. त्याची आवक कमी आहे. त्यामुळे चार दिवसांपासून दर वाढले आहेत.
- मनीषा गाडेकर, भाजीविक्रेत्या
भाज्या बाजारातील दर घराजवळील दर
भोपळा ४० ५०
गवार ८० १००
कारली ४० ६०
टोमॅटो २० ३०
बटाटे २० ३०
फ्लॉवर ६० ८०
सिमला मिरची ५० ८०
काकडी ३० ४०
दोडका ६० ८०
मागणी वाढली
सध्या पितृपक्ष असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे.
पावसामुळे आवक कमी झाली आहे.
शिमला मिरची, गवार, फ्लॉवरला जास्त भाव.
अर्धा किलोसाठी बाजारात कोण जाणार
काही वेळा घराजवळ भाजीपाला महाग मिळतो हे माहीत आहे. मात्र, अर्धा किलोसाठी दूर बाजारात भाजी खरेदीसाठी आजघडीला परवडत नाही. त्यात पेट्रोलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे घराजवळच महाग भाजी घेतलेली परवडते.
- रोहिणी भोसले, गृहिणी
पितृपक्ष पंधरवाडा सुरू असल्याने भाज्यांची जास्त गरज असते. पितृपक्षातील जेवणात भाज्यांना जास्त महत्त्व असते. भाज्या घेतल्याशिवाय पर्याय नसतो. महागाई सगळीकडूनच वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
- रेणुका कदम, गृहिणी