जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, मागास प्रवर्गातून अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणी करण्यासाठी येथील सामाजिक न्याय भवन मधील जात पडताळी कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून गर्दी करु लागले आहेत. उमेदवारांचे दिवसाकाठी १०० ते १५० अर्ज स्वीकारले जात आहेत. तर विद्यार्थ्यांचे ३० ते ३५ अर्ज येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मागील दोन दिवसांपासून गर्दी होत आहे. गुरुवारी दुपारी १२. वाजता अर्ज स्वीकृती खिडकी समोर उमेदवार तसेच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यातील काही उमेदवारांच्या नाका-तोंडास मास्क लावलेले होते. तर काही जण मात्र मास्क हणुवटीवर लटकवलेले पाहावयास मिळाले. काही विद्यार्थ्यांनी मास्क लावलेले होते. तर काही जण विनामास्कचे परिसरात वावरत असल्याचे आढळून आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वाढती गर्दी लक्षात घेता रांगा लावण्यात आल्या होत्या.
१५ टक्के विद्यार्थी
मागील काही दिवस जातपडताळी कार्यालयात अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेस प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी जात पडताळणी करण्यासाठी गर्दी करीत होते. कादपत्रांत काही त्रुटी राहिल्या का पाहावयासाठी विद्यार्थी व पालक येत असत. सध्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ३० ते ३५ विद्यार्थी अर्ज दाखल करीत आहेत. ते प्रमाण १५ टक्के आहे.
उमेदवारांची रेलचेल
मागास प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य असते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सामाजिक न्याय भवन मधील जात पडताळणी कार्यालयात रेलचेल वाढली आहे. जात पडताळीसाठी काय कागदपत्रे लागतात हे पाहण्यासाठी अनेक उमेदवार येत आहेत. तसेच अनेक जण कादपत्रे सादर करीत आहेत.
कोट...
निवडणुकीसाठी उमेदवार तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेशसाठी जातपडताळणीसाठी अर्ज करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळण्याकरिता फिजिकल डिस्टन्स अनिवार्य केले आहे. एस.पी. नाईकवाडी, संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,
प्रशासनातर्फे दक्षता
गर्दी टाळण्याकरिता जात पडताळणी कार्यालयामार्फत अर्जदारांच्या फाईली जमा केल्या जात आहेत. त्यानंतर नंबर प्रमाणे त्या व्यक्तीचे नाव पुकारुन त्यांना अर्ज जमा केल्याची पोच देण्यात येत आहे. शिवाय कागपत्रांची माहिती सांगण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत.
रोज २०० अर्ज
मागील दोन दिवसांपासून अर्ज सादर करण्यासाठी गर्दी होत आहे. उमेदवारांचे १५० ते १७० व विद्यार्थ्यांचे ३० ते ३५ अर्ज दाखल होत आहेत. असे एकूण २०० च्या जवळपास अर्जांची दररोजची संख्या होत आहे.