कळंब तालुक्यातील मस्सा खं. शिवारातील एका शेतात कडब्याच्या गंजीमध्ये गांजाचा साठा दडवून ठेवला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याचा छडा लावत १ जून रोजी या ठिकाणी रेड केली होती. यात ४७ पोत्यांमध्ये तब्बल १ हजार १३२ किलो ६६ ग्रॅम एवढा गांजा आढळून आला होता.
दरम्यान, हा गांजा १ कोटी २४ लाख ५९ हजार रुपये एवढ्या किमतीचा असून, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांच्या फिर्यादीवरून बालाजी छगन काळे व राजेंद्र उर्फ दादा छगन काळे यांच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलमान्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अतुल पाटील करीत होते. दरम्यान, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तपासाधिकारी अतुल पाटील, कर्मचारी पोपट जाधव यांच्या पथकाला राजेंद्र उर्फ दादा छगन काळे यास गजाआड करण्यात यश आले.
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी...
सव्वा कोटीच्या गांजा प्रकरणात फरार असलेल्या मस्सा खं. ता. कळंब येथील राजेंद्र उर्फ दादा छगन काळे (५०) यास अटक केल्यानंतर गुरुवारी कळंब न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे, तसेच या प्रकरणातील दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक अतुल पाटील यांनी सांगितले.