उस्मानाबाद : संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या डिझेल चोरांच्या टोळीला अखेर सोमवारी गुन्हे शाखेने वेसण घातली आहे. चार जणांची टोळी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सुमारे १० लाखांचा मुद्देमालही तातडीने हस्तगत केला. या टोळीने आतापर्यंत ८ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, उस्मानाबाद, कळंब, वाशी तालुक्यासह महामार्गालगतच्या महत्त्वाच्या ठिकाणी गुन्हे घडवून आणले आहेत. उस्मानाबादसह शेजारच्या लातूर जिल्ह्यातही सोलापूरहून इंधनाचे टँकर नियमित जात असतात. अशा टँकर्सवर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी त्यातील डिझेल चोरण्याचे प्रकार वाढले होते. यासंदर्भाने नजीकच्या काळात कळंब, येरमाळा, ढोकी, आनंदनगर, उमरगा, वाशी ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या टोळीचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रा. तिलक रौशन यांनी गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह उपनिरीक्षक पांडुरंग माने व कर्मचाऱ्यांनी खबऱ्यांची मदत घेत एका टोळीचा माग काढला. ही टोळीच असे गुन्हे घडवून आणत असल्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी आरोपी भास्कर शहाजी शिंदे, सुंदर बबन शिंदे, तथन बबन शिंदे व आबा शहाजी काळे (सर्व रा. गायरान पेढी, इटकूर, ता. कळंब) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता ८ गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. तसेच त्यांच्याकडील डिझेल, टँक, रोकड, वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.
बनावट चावीने उघडायचे पाइप...
आरोपी हे प्रामुख्याने महामार्गावर थांबलेल्या टँकर्सना आपले लक्ष्य बनवत होते. जेवणासाठी किंवा विश्रांतीसाठी चालकाने वाहन थांबविले की लागलीच ही टोळी बनावट चावीने पाइपचे लॉक उघडून त्यातून स्वत:कडील पाइप जोडून डिझेल काढायचे व टँकमध्ये भरून तेथून पळ काढायचे.