घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन : प्रत्येक कुटुंबास देणार दोन डस्टबिन
उस्मानाबाद : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यात २०० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गावांत कचरा संकलन केंद्र, घंटागाडी, प्रत्येक घरी दोन कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ६२ ते ६३ कोटींची तरतूद आहेत.
आजही अनेक गावांत सांडपाण्याची व्यवस्था नसते. पाणी रस्त्यावरून वाहते. मोक्याच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी याकरिता १६ संस्था नियुक्त केल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २०० गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५५ तर दुसऱ्या १४५ गावात कामे केली जाणार आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून ६२ ते ६३ कोटींची तरतूद केली आहे. सदरील निधीतून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबासाठी दोन कचराकुंड्या पुरविण्यात येतील. डोअर तू डोअर कचरा संकलनासाठी एक बॅटरीवर चालणारी घंटागाडी, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू नये यासाठी सार्वजनिक कचराकुंडी, प्रत्येक घरासाठी शोषखड्डा तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये ही उभारण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक गावात कचरा संकलन केंद्रही उभारले जाणार आहे.
चौकट... प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र... २०० गावांत कचरा संकलन केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रात संकलित होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल. यातून निघणारा प्लास्टिक कचरा एकत्रित करून तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचरा प्रोसेसिंग युनिटला पाठविला जाईल. अशा एका युनिटवर १६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे युनिट असेल.
...तर पीव्हीसी पाईप गटार ५ हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पीव्हीसी पाईप गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अशा गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
कोट.... जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ५५ गावांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच कामे सुरू होतील. हा प्रकल्प राबविण्यासाठी १६ संस्थांची निवड केली आहे.
-अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.