दुर्घटना : केमवाडी येथील घटना
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती हाेऊन लागलेल्या आगीत सुमारे लाखाचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील केमवाडी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये मंगळवारी सकाळी १० वाजता घडली.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील आबासाहेब कारंडे हे मागील वर्षभरापासून कोरोनाच्या भीतीने शेतातच पत्र्याचे शेड उभारून वास्तव्य करीत आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरगुती वापराच्या सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती सुरू झाली. अचानक वायू गळती हाेऊन लागलेल्या आगीत घरात बसलेले आबासाहेब कारंडे, मयुरी कारंडे, आत्माराम कारंडे, शंभू कारंडे, तेजस्विनी कारंडे बालंबाल बचावले. मात्र, दुचाकी, कपडे, तसेच अन्नधान्य मिळून सुमारे लाखाचा ऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घटनेनंतर आबासाहेब करंडे यांनी तामलवाडी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अकस्मात जळिताची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.