तुळजापूर : तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी घेण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी मंदिर बंद असल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या घटकांना दिलासा देण्यासाठी तातडीने मंदिर खुले करून व्यवहार सुरळीत करण्याची गरज निवेदनामध्ये व्यक्त केली आहे. वास्तविक कोरोना संसर्गामुळे बंद झालेले २५ जिल्हे खुले झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंदिर उघडणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून असल्यामुळे दरमहा दहा हजार रुपये या सर्व कुटुंबांना मदत देण्यात यावी. तसेच पुजारी व छोटे व्यापारी यांच्या मदतीसाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी या निवेदनामध्ये चव्हाण यांनी केली आहे.