उस्मानाबाद - साखरपुडा करायला गेले अन् लग्नच उरकून आले, अशी बातमी आपण वाचली आहे. मात्र, मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली. महेश केशव गायकवाड असे शेतकरी कुटुंबातील नवरदेवाचे नाव आहे. तर विशाखा संभाजी शिंदे असे वधु मुलीचे नाव आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे लग्नाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या या उपक्रमाचे गावपातळीवर कौतूक होत आहे.
सोलापूरच्या पाथरी येथील महेश केशव गायकवाड हे आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी वाशी तालुक्यातील गोलेगाव येथे गेले होते. साधारण दुपारी दोन वाजता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाची चर्चा सुरु होती. मात्र, मुलाचे भाऊजी बालाजी चौधरी आणि राजाभाऊ बाराते यांनी पुढाकार घेत दुष्काळी परिस्थितीचा दाखला घेत लगेच लग्न करण्याचा विचार मांडला. त्यास, मुलाचे वडिलबंधू रमेश गायकवाड, न्या. दिनेश गायकवाड आणि अमोल गायकवाड यांनी सहमती देताच लग्न करण्याचं ठरलं. त्यानंतर, दिवाळीच्या पाडव्यादिवशीच गुरुवारी सायंकाळी लग्नासोहळा पार पडला.
बी कॉम पदवीधर शिक्षण घेतलेल्या विशाखानेही व्यवसायाने शेतकरी असलेल्या महेशसोबत संसार करण्याचा होकारार्थी निर्णय एका क्षणात कळवला. त्यानंतर, लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मुलगी अन् नारळ या परंपरेनुसार लग्न सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात पडला. या लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजकीच वऱ्हाडी मंडळी हजर होती.
शेतकरी मुलाला पसंती शेतकरी कुटुंबातील महेश हा पदवीधर असून वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करतो. विशेष म्हणजे महेशच्या कुटुंबातील दोन्ही वडिलबंधू उच्च शिक्षित असून रमेश गायकवाड हे प्राध्यापक आहेत. तर दिनेश गायकवाड हे न्यायमूर्ती आहेत. तरीही, कुठलाही बडेजाव न करता, किंवा मोठेपणाचा कुठलाही आव न आणता साधारणपणे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीधर असलेल्या विशाखानेही तात्काळ लग्नाला होकार देत शेतकरी महेशला आपला आयुष्यभराचा साथीदार निवडले. इंजिनिअरच मुलगा हवा असा अट्टाहस करणाऱ्या मुलींपुढे पदवीधर विशाखाने एक आदर्श घालून दिला आहे.
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्यमुलीकडील सर्वसाधारण परिस्थितीचा अंदाज घेत गायकवाड कुटुंबीयांनी लग्नातील खर्चाला फाटा देण्याचे ठरवलं. तसेच, ना घोडा, ना बँड, ना नेते ना प्रतिष्ठित व्यक्तींची रांग, केवळ हजर असलेल्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लग्नासाठी अनावश्यक खर्च करुन दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागू नये, यासाठी हा निर्णय एकमताने घेतला. विशेष म्हणजे यास नवरा आणि नवरीने पसंती दिल्यानेच हे शक्य झाल्याचे, गायकवाड कुटुबीयांनी म्हटले.