कळंब (उस्मानाबाद) : शिक्षण व स्पर्धा परिक्षेच्या क्लाससाठी लागणारी रक्कम घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे उपलब्ध होत नसल्याने एका २० वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री कळंब तालुक्यातील पिंपरी (शि.) येथे घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकानी रविवारी सकाळी मयत मुलीचे पार्थिव शिराढोण ठाण्यासमोर नेऊन विविध मागण्यांसाठी ठिय्या मांडला होता.
कळंब तालुक्यातील पिंपरी (शि.) येथील अविनाश राजेंद्र राऊत यांची मुलगी प्रगती (वय-२०) ही मुरूड (ता. लातूर) येथील संभाजी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत होती. तृतीय वर्षात असलेली प्रगती हुशार व होतकरू होती. विविध स्पर्धा परिक्षा देवून नोकरीची संधी अजमावत होती. आपल्या अंगात जिद्द, चिकाटी असतांना तिच्या प्रयत्नात घरच्या हलाखीच्या स्थितीची आडकाठी येत होती. वडील अविनाश राऊत यांना जेमेतेम एक एकर कोरडवाहू शेती. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलीच्या शिक्षणाचा भार मोलमजुरी करून सोसत होते. त्यातच दुष्काळ, नापिकीमुळे स्थिती अधीक बिकट बनत चालली.
शनिवारी सकाळी प्रगती हिने वडिलांकडे नवीन जागा निघालेल्या परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी, रेल्वेची मुंबई येथील परिक्षा देण्यासाठी व खाजगी शिकवणी लावण्यासाठी काही रक्कम लागणार असल्याचे सांगितले. यावर वडिलांनी आपल्या जवळ असलेले पाचशे रुपए देवून ‘आत्ताचा अर्ज भरून घे, मी फायनान्सकडून कर्ज काढून उर्वरीत रक्कमेची सोय करतो’ असे मुलीला सांगितले. त्यानंतर ते पत्नीसह ते कळंबला कर्ज मिळविण्यासाठी रवाना झाले. सायंकाळी घरी आल्यानंतर मात्र, त्यांची मुलगी प्रगती हिने राहत्या घरी गळफास घेतल्याचे समजले. या घटनेने राऊत कुटुंबावर मोठी शोककळा पसरली असून, हालाखीच्या परिस्थितीमुळे प्रगतीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी सकाळी शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी मयत प्रगतीचे पार्थिव शिराढोण पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन ठिय्या मांडला. मयत मुलीच्या भावास सराकरी नोकरी द्यावी, कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी कळंबच्या उपविभागीय अधिकारी डॉ. चारूशिला देशमुख, तहसीलदार अशोक नांदलगावकर यांनी शिराढोण पोलिस ठाण्यात नातेवाईकांची भेट घेवून मागण्या शासनस्तरावर कळविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी पार्थिव ताब्यात घेऊन दुपारी अंत्यसंस्कार केले.
कर्ज काढून आले अन्...शनिवारी सकाळी अविनाश राऊत हे मुलीच्या शैक्षणिक गरजेसाठी कर्ज मिळावे म्हणून पत्नी समवेत कळंब शहर गाठले. याठिकाणी दिवसभर धावपळ करून ६० हजाराची रक्कम मिळविली़ सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना प्रथम आपल्या मुलीला सांगायचे होते की ‘तुला गरज असलेली रक्कम मिळाली आहे.’ परंतु, नियतीने दुसरेच चित्र समोर उभे केले होते. लाडक्या मुलीचा घरातील पत्र्याच्या आडूस लटकणारा मृतदेह पाहून राऊत दाम्पत्याने मोठा हंबरडा फोडला.
प्रगतीला ‘दिव्याचा' आधारअविनाश राऊत हे आपल्या तोकड्या शेतामधील पत्र्याच्या शेडमधील घरात राहत होते. विजेची सोय नसलेल्या या घरात होतकरू व जिद्दी प्रगती तेलावरील दिव्याचा आधार घेत आपले भविष्य घडवत होती. याच घरातील लोखंडी आडूला, आपल्या ओढणीने गळफास घेवून प्रगतीने आपले जीवन संपवले. आपल्या वडिलांचे अर्थकारण दुष्काळी स्थितीमुळे कोलमडून गेल्याचे न पहावल्यानेच प्रगतीने हे पाउल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांत होती.