तुळजापूर (उस्मानाबाद) : कुंकवाच्या भंडाऱ्याची-आपट्याच्या पानाची उधळण करीत संबळ, नगारा, तुतारी, हलगी, बँडच्या निनादात व ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात श्री तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन आज पहाटे उत्साहात पार पडले. यानंतर आता देवीच्या पाच दिवसीय श्रमनिद्रेस प्रारंभ झाला़ आहे़
सीमोल्लंघनापूर्वी मूर्तीस मध्यरात्री १२ ते पहाटे २ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक घालण्यात आला़ यादरम्यान, नगरहून आलेल्या मानाच्या पालखीचे संस्थानचे अध्यक्ष ता जिल्हाधिकारी डॉ़राधाकृष्ण गमे यांनी आरती केली व पालखीचे मानकरी विजय भगत यांना मानाचा रुपया व श्रीफळ देऊन सीमोल्लंघनासाठी आमंत्रित केले़ तसेच मानाच्या पलंगाचीही आरती करुन मानकरी बाबुराव पलंगे, गणेश पलंगे यांना मानाचा रुपया व श्रीफळ देत आमंत्रित केले़ यानंतर पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास पालखी व पलंगाची सवाद्य मिरवणूक काढून पहाटे चार वाजता मंदिरात आणण्यात आले़
धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीची मूर्ती सिंहासनावरुन पालखीत आसनस्थ करण्यात आली़ प्रदक्षिणा व सीमोल्लंघनासाठी निघालेल्या देवीची पालखी पिंपळपारावर येताच येथे नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली़ याच ठिकाणी नगरहून आलेल्या पलंगावर मूर्तीस निद्रेसाठी ठेवण्यात आली़ येथूनच देवीच्या पाच दिवसीय श्रमनिद्रेस सुरुवात झाली़ अश्विनी पौर्णिमेस या निद्रेची सांगता होणार आहे़ यावेळी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती़