- बालाजी आडसूळकळंब (जि. धाराशिव) - मुक्या प्राण्यांवर जीव लावला की त्यांचा सहवास लळा लावतो. मग, तो प्राणी कुंटूबाचाच एक घटक बनतो. असाच एक मुका जीव अन् माणसांतील स्नेहबंधाचा ठेवा कळंबमध्ये समोर आला आहे. येथील गुरव परिवाराने ‘डाॅली’च्या आयुष्यातील ‘गुड न्यूज’ समजताच एखाद्या लेकीप्रमाणे तिची काळजी तर घेतलीच, शिवाय हौसेने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ही घेतला आहे.
कळंब येथील माजी नगराध्यक्षा सविता पांडूरंग गुरव यांचे कुंटूब प्राणीप्रिय. यातूनच ते सातत्यानं वेगवेगळ्या वंशाचे श्वान सांभाळत आले आहेत. मागच्या चार वर्षापूर्वी त्यांच्या कुंटूबात या प्राणी प्रेमातूनच इवलीशी ‘लॅब्राडॉर’ नावाची कुत्री दाखल झाली. पुढे ‘डॉली’ हे नामकरण झालेल्या या पिल्लाचे मागच्या चार वर्षाच्या काळात चांगले संगोपन झाले. तिच्यावर संपूर्ण कुटुंबांचा जीव जडला. घरातील एक सदस्य म्हणूनच तीचा वावर व सांभाळ होत असे. मध्यंतरी लाडक्या डॉलीची ‘गुड न्यूज’ गुरव कुंटूबाना समजली. यानंतर तर विशेष काळजी घेण्यास सुरूवात झाली. अगदी लातूरच्या एका वैद्यकाकडे नियमीत तपासणी, आहार ते विहार यावर खासं लक्ष ठेवण्यात आले. एकूणच सविता गुरव व त्यांचे कुंटूब यासाठी सातत्याने दक्ष राहत असे.
संपूर्ण घराची केली सजावट...‘अंतरी भूतदया’ ठायी असलेल्या गुरव कुंटूबाने आपल्या लाडक्या ‘डॉली’च्या डोहाळे जेवणाचा संकल्प केला. माणसांच्या जीवनप्रवासात विविध टप्यात संस्कार सोहळे होतात, मग या मुक्या जीवाचे का नाही? अशी यामागची भावना . यातूनच मग ‘ॲनिमल लव्हर्स’ गुरव कुटुंबाने बेबी शॉवर्स, फुगे लावत संपूर्ण घराची सजावट केली. समोर आरास मांडत डॉलीचे आवडते खाद्य केक, बिस्कीट, ब्रेड, टोस्ट, जाम ठेवले. पाच प्रकारचे फळं, हिरवी साडीचा मान म्हणून हिरवा ड्रेस, फुलाचा हार व गजरा, तांदुळ, नारळ, सुपारी, हळकुंड यासह डॉलीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न केला.